8/04/2017

संवाद संपत चालला आहे का?

माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे त्याला अन्न, वस्त्र, निवार्‍याशिवाय संवादाचीही गरज असते. अर्थात ही गरज अनिवार्य नाही. मात्र सलग २४ तास जर आपण एक शब्दही न बोलता राहिलो तर काय अवस्था येते याचा केवळ विचारच केलेला बरा. संवादाच्या माध्यमातून माणूस आपले ज्ञान, माहिती, भावना इतरांपर्यंत पोहोचवित असतो. अगदी दशकभरापूर्वीपर्यंत असे संवाद घरात, दारात, गावात आणि सार्वजनिक ठिकाणी व्हायचे. त्यातून माहितीचा, ज्ञानाचा प्रसार व्हायचा. शंका-कुशंकांचे निरसन व्हायचे. आपली मते मांडली जायची. दुसर्‍यांची मते ऐकून घेतली जायची. आवश्यक असणारी माहिती स्वीकारली जायची. खोटी वाटणारी माहिती सोडून दिली जायची. गल्लीपासून-दिल्लीपर्यंत हजारो विषयांवर एकाच वेळी चर्चा व्हायची. प्रत्येकजण आपल्याला माहित असणारी माहिती सांगायचा. अशा प्रकारे माणसे समोरासमोर बोलायची. त्यांच्यामध्ये खराखुरा संवाद व्हायच.  संवादाच्य माध्यमातून माणसे माणसांना भेटायची. आजही अशा प्रकारचा संवाद होतो. पण त्याचे प्रमाण दखल घ्यावे एवढ्या वेगाने कमी होत आहे.

काळ बदलत चालला आहे. संवाद सुरू आहे पण माणसांच्या माध्यमातून नव्हे तर यंत्रांच्या माध्यमातून. मानवी बुद्धीच्या उत्कटतेच्या आणि विशालतेच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा उन्नत आविष्कार प्रत्यक्षात अवतरला आहे. त्यातून हजारो किलोमीटर दूर असलेल्या माणसाला प्रत्यक्ष पाहता येणे आणि बोलता येणे सहज शक्य झाले आहे. अगदी दुसर्‍या ग्रहावर म्हणजे चंद्रावर गेलेल्या माणसाशीही संवाद शक्य झाला आहे. संवादाच्या माध्यमामध्ये अमूलाग्र बदल झाला आहे.  घर, दार आणि सार्वजनिक ठिकाणांची जागा सोशल मिडियाद्वारे केल्य जाणार्‍य संवादाने घेतली आहे. `नमस्कार’, `राम राम’ची जागा `व्हॉटस अप’ ने घेतली आहे. माणूस माणसांना न भेटताच बोलू लागला आहे. जिवंत माणूस शेजारी बसलेला असताना शेकडो किलोमीटर दूर असलेल्या माणसाशी आभासी संवाद करण्याचा मोह नियंत्रणाच्या पलिकडे माणसाच्या मनावर स्वार झाला आहे. सगळं काही आभासी होऊ लागलं आहे. माणूस संवादापेक्षा स्वत:ची प्रतिमा जपण्यात मग्न झाला आहे. प्रत्यक्षातील प्रतिमेपेक्षा व्हॉटसअॅपचा डीपी आणि फेसबुकच्या प्रोफाईल फोटोद्वारे प्रतिमा जपण्यात माणूस बिझी झाला आहे. मी, माझं या चक्रात माणूस दिवसेंदिवस अधिकाधिक अडकत चालला आहे. खाजगी, सार्वजनिक आयुष्यातील आनंदाचे, दु:खाचे क्षण, समारंभ, उत्सव, महोत्सव प्रत्यक्ष अनुभवण्यापेक्षा कॅमेर्‍यात कैद करण्याकडे माणसाचा कल वाढला आहे. तो तेवढ्यावरच थांबत नाही. तर हे सारे अनुभव जगापर्यंत पोहोचविण्याची त्याला घाई झाली आहे. जगाने आपले क्षण पाहावेत त्यावर प्रतिक्रिया द्यावी, कौतुक करावं किंवा दु:खात सहभागी व्हावं यासाठी त्याची सारी धडपड सुरू झाली आहे. आपल्या आप्तस्वकीयांच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाचे फोटो शेअर करण्याची इच्छा व्हावी यापेक्षा असंवेदनशीलतेचे दुसरे दुदैर्वी उदाहरण काय असू शकेल? याही पेक्षा भयानक म्हणजे फेसबुक पोस्ट किंवा फेसबुक लाईव्हद्वारे स्वत:च्या मृत्यूचे थेट प्रक्षेपण करून आत्महत्या करणार्‍या पिढीचा जन्म होत आहे. याला संवाद म्हणायचं का? याचा विचार करण्याची ही गरज आहे. नव्हे नव्हे आता ती अपरिहार्यताच झाली आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सार्वजनिक आचारसंहिता पायदळी तुडविली जात आहे. हयातीत असलेले किंवा नसलेले ज्येष्ठ, श्रेष्ठ नेते किंवा महापुरुष यांच्या इतिहासाबद्दल आणि वर्तमानाबद्दल वेगवेगळी मते नोंदविण्यात येत आहेत. आपल्याला हवे ते मत सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करण्यात ही पिढी बिझी झाली आहे. त्यातून इतिहासाची चिरफाड करून आभासी संवादाद्वारे व्हॉटसअॅपच्या मेसेजेसमधून फोनची मेमरी फुल्ल होत  चालली आहे. एकेकाळी आवडीच्या क्षेत्राचा इतिहास आणि त्यासंदर्भातील नवनवी संशोधने डोक्यात साठविली जात होती आणि प्रत्येकजण तेथूनच त्याचा शोध घेत होता. आता ती व्हॉटसअॅप किंवा गुगलवर सर्च केली जात आहेत.  वर्तमानात जगण्यापेक्षा माणूस इतिहासाला प्राधान्य देत भविष्याची चिंता करत बसला आहे.

हसण्याची, रडण्याची, आश्चर्य व्यक्त करण्याची, दु:ख व्यक्त करण्याची, कौतुक करण्याची, टाळ्या वाजवण्याची आणि सगळ्याच मानवी भावनांची जागा दोन बाय दोन मिलिमीटरच्या इमोजीने घेतली आहे. आनंदाचे, दु:खाचे, कौतुकाचे सोहळे हाताच्या तळव्यावर मावतील एवढ्या डिव्हाईसेसवरच साजरे होत आहेत. या सार्‍या परिस्थितीकडे माणूस म्हणून उघड्या डोळ्यांनी आणि संवेदनशील हृदयाने पाहिले तर ही सारी परिस्थिती गंभीर म्हणावी नव्हे नव्हे त्यापेक्षा गंभीर आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हजारो लाभ झाले असले तरीही त्यातून झालेले तोटे माणसाचे अस्तित्व जोपर्यंत टिकून तोपर्यंत न भरून निघणारे आहेत. माणूस माणसाला स्पर्श करण्याऐवजी डिव्हाईसेसला स्पर्श करत आहे. ही परिस्थिती अशीच टिकून राहिली आणि जर माणूस माणसाला स्पर्श करण्याऐवजी केवळ डिव्हाईसेसलाच स्पर्श करत राहिला तर त्यानंतर अल्पावधीतच माणसाचे एकूण अस्तित्वच नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

डिव्हाईसेस आणि आभासी संवादातून बाहेर येऊन माणसाने माणसाची माणसाप्रमाणे प्रत्यक्ष संवाद करावा आणि माणसाचे अस्तित्व टिकवावे असे मला मनापासून वाटते.

1 comments:

  1. आज कि दुनया में हमें सबकुछ आसानी से मिल जाता है। इन्टरनेट हमारे पास हैं तो हमें सबकुछ आसान सा हुआ हैं। इन्टरनेट हैं तो हम आपने दुर के रिश्ते दारों को हम सामने देख सकते हैं। जबकि पच्चीस साल पहलें किसी को मिलना भी था तो कहीं-कहीं वर्ष बाद मिलना होता था। आज इक मिनट में बात होती हैं। मां आपनी बेटीक को ससुराल में कैसी हैं। इक या दो मिनट में जान लेती हैं जब की बिस साल पहले किसी बेटी को अपना दुख दर्द किसी के सामने कहने का साधन नहीं था। उसे एक बात कहने के लिए। कहीं महीने लग जाते थे। ओ बेटी आपना दुख दर्द किसी से कहें बिना ही अपने आज को मन में दफ्न करते हुऐ ही दुनिया से अलविदा कहती थी। फिर कुछ दिन बित जाने पर माता पिता तक बात पहुंचती थी। लेकिन आज दुख आने से पहले ही बात का सोलूशन मिल जाता है। आने वाले फिक्र को पहले ही मिटाया जाता है। आज जो दुख देने वाले ससुराल के कोई भी हो ओ इन्टरनेट को ध्यान में लेते हुए खुशी को ही सामने लाते है।

    ReplyDelete

Related Posts Plugin for WordPress, Blogger...