6/24/2016

माझी जात: माणूस, धर्म: माणुसकी

तो संपन्न कुटुंबातील होता. त्याला चांगली नोकरी होती. आई-वडिल, पत्नी आणि एक मुलगी असे त्याचे सुखी कुटुंब होते. तो कर्तृत्वालाच देव मानणारा होता. त्याला जात, पात, धर्म, पंथ वगैरे वगैरे बंधने अजिबातच मान्य नव्हती. ही व्यवस्था बदलायला हवी, त्यासाठी आपण काहीतरी करायला हवे असे तो नेहमी म्हणायचा. त्याची मुलगी आता बोलू लागली होती. शाळेत जाऊ शकेल एवढी मोठी झाली होती. त्यामुळे तो आता चांगल्या शाळेची शोधाशोध करू लागला. शेवटी मराठी माध्यमाची एक अनुदानित शाळा त्याला पसंत पडली. तेथे त्याने प्रवेशासंबंधी चौकशी केली. शाळा नामवंत असल्याने प्रवेशासाठी मुलाखत वगैरे मोठी प्रक्रिया पार पाडावी लागणार होती. विशेष म्हणजे पालकांसह लहान मुलांचीही परीक्षा घेण्यात येणार होता. ही एवढी किचकट प्रक्रिया पाहून त्याला आश्‍चर्य वाटले. लहान मुलाची परीक्षा म्हणजे तर अतिरेक वाटला. पण व्यवस्था अशी एकदम बदलता येणार नव्हती. तरीही त्याने जमेल तेथे बदल घडवायचा निश्‍चय केला. त्याने प्रवेश परीक्षेसाठीचा अर्ज घेतला. त्यानंतर काही दिवसांनी ठरल्याप्रमाणे मुलाखत झाली. त्याची मुलगी त्यात पास झाली. आता त्याने प्रवेशासाठी अर्ज खरेदी केला.

घरी आल्यावर संध्याकाळी त्याने प्रवेश अर्ज भरायला सुरूवात केली. त्यावर नाव, गाव, पत्ता, संपर्क क्रमांक, पालकाचा व्यवसाय या सर्व माहितीसह जात आणि धर्म ही माहिती देणेही बंधनकारक होते. इतर सर्व माहिती भरून त्याने जात आणि धर्माबाबत काय माहिती द्यावी, याचा विचार केला. काही वेळाने त्याच्या डोक्‍यात प्रकाश पडला. त्याने लिहिले "जात माणूस आणि धर्म माणुसकी‘! मात्र त्याने दिलेल्या माहितीमुळे त्याची पत्नी थोडीशी नाराज झाली. ती म्हणाली, "अहो तुमच्या या अशा वागण्यामुळे आपल्या पोरीचे वर्ष वाया जाईल.‘ त्यावर त्याला अगदी स्फुरण चढले. तो म्हणाला, "मी दिलेली माहिती खरी आहे. त्यामुळे मला काहीही भीती नाही. आणि हो जर तिचे वर्ष वाया जाऊन हे जग माणूस नावाची जात आणि माणुसकी नावाचा धर्म मानणार असेल तर मला त्यात आनंदच आहे.‘ त्यावर ती म्हणाली, "तुमचं आपलं काहीतरीच...‘ त्यावर "बघू गं मी करतो बरोबर. तू काळजी करू नको‘ असे म्हणत त्याने पूर्णविराम दिला.

दुसऱ्या तो प्रवेश अर्ज घेऊन शाळेत गेला. शाळेतील संबंधितांनी त्याचा अर्ज दाखल करून घेतला. ते म्हणाले, "अहो तुमची कॅटॅगरी कोणती?‘ तो म्हणाला, "म्हणजे?‘ "अहो म्हणजे तुम्हाला कोणत्या कॅटॅगरीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे?‘ त्यावर तो निरागसपणे म्हणाला, "विद्यार्थ्यांच्या कॅटॅगरीत‘ त्यावर संबंधित व्यक्तीने चिडून मुलीचा प्रवेश अर्ज देत सांगितले, "तुम्ही मुख्याध्यापकांना भेटा‘ त्यामुळे तो मुख्याध्यापकांना भेटायला गेला. मुख्याध्यापकांना त्याने सांगितले, "सर, माझी जात माणूस आहे आणि माझा धर्म माणुसकी आहे. माझी माहिती खरी आहे आणि माझ्या मुलीला विद्यार्थ्यांच्या कॅटॅगरीत प्रवेश हवा आहे‘ त्यावर मुख्याध्यापकांनी त्याला समजावले. "हे बघा. तुमची जात आणि धर्म जाणून घेण्यात आम्हाला रस नाही. मात्र नियमांप्रमाणे आम्हाला ही सारी माहिती शासनाकडे सादर करावी लागते. त्यांनी जर काही त्रुटी काढली आणि तुमचा प्रवेश रद्द झाला तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही.‘ तो म्हणाला, "हरकत नाही‘ "ठीक आहे. मग तुम्ही तसे लिहून द्या‘ मुख्याध्यापकांनी सांगितल्याप्रमाणे त्याने लिहून दिले.

शाळा नियमितपणे सुरू झाली. आठ दिवसांनी मुख्याध्यापकांनी त्याला शाळेत बोलावून घेतले. तो आला. त्याच्या मुलीचा प्रवेश अर्ज दाखवत त्याने शासकीय अधिकाऱ्याने मारलेला शेरा दाखवला. त्यावर हा म्हणाला, "हे बघा मी हीच जात आणि हाच धर्म लिहिणार. आणि तो खोटा नाही. मी आता जाऊन या अधिकाऱ्याला भेटतो. "हा घ्या अर्ज. तुम्ही तुमच्या पातळीवर काय करायचे ते करा‘, असे म्हणत मुख्याध्यापकांनी विषय संपवला. तो थेट संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यालयात आला. अर्ज दाखवत त्याने सांगितले, "माझी जात आणि माझा धर्म हाच आहे‘ त्यावर अधिकारी म्हणाला, "हे बघा. रेकॉर्डला तुमच्या मुलीला कोणत्या कॅटॅगरीत प्रवेश देणार मग? प्रत्येक कॅटॅगरीत काही जागांचा कोटा असतो. तुमच्या या अशा माहितीमुळे अडचण निर्माण होईल.‘ त्यावर तो म्हणाला, "हे बघा तुम्हाला ज्या कॅटॅगरीत वाटेल, त्या कॅटॅगरीत प्रवेश द्या. मात्र मी माझी माहिती बदलणार नाही.‘ "ठीकाय. तसे लिहून द्या. मी आमच्या वरिष्ठांना विचारतो आणि कळवतो. पण फार काही फरक पडणार नाही. जोपर्यंत ही व्यवस्था आहे, तोपर्यंत तुम्हाला तुमची जात आणि तुमचा धर्म लिहावाच लागेल. बदल असा एका रात्रीतून होत नसतो हो. त्यासाठी तुम्हाला फार कष्ट करावे लागतील‘, असे म्हणत अधिकाऱ्याने त्याची समजूत काढली.

काही दिवसांनी त्याला समजले की वरिष्ठांनाही ही नाविन्यपूर्ण कृती आवडली आणि त्याच्या मुलीचा किमान एका वर्षासाठी तरी प्रवेश निश्‍चित झाला. त्याच्या मुलीची जात ठरली माणूस आणि धर्म ठरला माणुसकी. आता मुलगी सर्वांना सांगू शकणार होती माझी जात माणूस आहे आणि माझा धर्म माणुसकी. त्याने अखेरपर्यंत हीच जात आणि हाच धर्म लिहिण्याचे ठरवले. अगदी कितीही अडचणी आल्या तरी...

(Courtesy: eSakal.com)

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...