11/20/2013

प्रिय हृदयास....

 तू किती छोटा आहेस रे? अगदी लहान बालकाच्या हातात मावेल एवढासा? पण तुझ्यात केवढं सामर्थ्य आहे! तू रक्ताची निर्मिती करून आम्हा माणसाची सारी अवयवं जिवंत ठेवतोस. तर प्रेमाची निर्मिती करून आम्हा माणसांना जिवंत का रहायचं ते सांगतोस. तू सतत धडधडत राहतोस. तू सतत निर्मिती करीत राहतोस. अगदी आमचे सारे अवयव झोपलेले असताना देखील तू जिवंत असतोस. तू जेव्हा थांबतोस तेव्हा मात्र आमचा जिवंतपणा संपतो आणि हे शरीर निरुपयोगी ठरून जाळलं जातं, गाडलं जातं किंवा पुरलं जातं!

तू निर्माण केलेल्या रक्तामुळेच आमचं डोकं चालतं, पण आम्ही पामर कधी कधी तुझ्याऐवजी आमच्या डोक्याचं ऐकतो. ज्याला तूच रक्तपुरवठा करून कार्यरत ठेवलेलं असतं. बाकी सार्‍या अवयवांच्या बाबतीतही तसचं आम्ही तुझे कधीच ऐकत नाही. तुझा सल्ला हा प्रेमाचा असतो. ममत्त्वाने भरलेला असतो. तू कधी आम्हाला चुकीचं अथवा खोटं मार्गदर्शन करणार नाहीस असा विश्‍वास आम्हाला असतोच असतो. त्यामुळेच तर एखादी वाईट घटना आमच्या हातून घडून गेली की ‘तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं’ असं आम्हांस वाटून जातं.

खरंच अरे हृदया जर आमच्या सार्‍या शरीराऐवजी केवळ तूच असलास तर? फक्त तू बदामाच्या आकाराचा, प्रेमाच्या रंगाचा फक्त तू! हृदय... तिथं मग सारी हृदयं सारखीच असतील. तिथं कोणताही भेदभाव असणार नाही. जात, पात, धर्म, पंथ, संप्रदाय तर सोडाच पण अगदी लिंगाचा, रूपाचा अथवा सौंदर्याचासुद्धा भेद असणार नाही. ज्याला हवं तो हव्या त्या हृदयावर प्रेम करू शकेल. लिंगभेद नसल्याने शरीरसंबंध आणि त्याद्वारे येणार्‍या वासनेचाही प्रश्न उरणार नाही. फक्त हृदय असल्याने  शरीर चालविण्यासाठी रक्ताच्या निर्मितीचीसुद्धा गरज उरणार नाही. ज्यामुळे उदरनिर्वाहाची देखील गरज असणार नाही. कोणाला कशाचीच गरज नाही. अगदी प्राणवायूची देखील नाही. त्यामुळे रस्ते असणार नाहीत, वाहनं असणार नाहीत, अगदी कशाकशाचीच गरज उरणार नाही. फक्त हृदयं, बदामाच्या आकाराची... त्यांना कोणतेही अवयव असणार नाहीत. हवेत, पाण्यात कोठेच कसलेच प्रदूषण असणार नाही. सारीकडे शुद्ध अन् पवित्र प्रेमाचे वारे वाहतील. सारे हृदयं प्रेमाच्या सागरात डुंबून जातील. तिथं जन्म असणार नाही, मृत्यु असणार नाही. अगदी आकाशातील चांदण्यांसारखं जग. पण या जगात चंद्रसुद्धा असणार नाही. फक्त हृदयं. आणि एका हृदयाचं आयुष्य संपलं की त्याचा मोठा स्फोट होणार आणि त्यातून असंख्य हृदयं निर्माण होणार! प्रेम करणारी, शुद्ध, पवित्र अन् निर्मळ...

हृदया, जा तुला ज्यानं निर्माण केलं त्याला सांग की फक्त मलाच ठेवा. माणसाच्या रूपाचं प्रतिक बनून प्रेमाचा सागर निर्माण करण्यासाठी मला संधी द्या म्हणून त्याला सांग. मग बघ आम्ही फक्त तुझंच ऐकू... जगात सारीकडे शांतता असेल, प्रेम असेल.... फक्त प्रेम, प्रेम अन् प्रेम...!!!

2 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...